पुणे – शारीरिक आणि मानसिक त्रास देत विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या सासऱ्याचा जामीन सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी फेटाळला. प्रथमदर्शनी पुराव्यावरून त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला.
सासरा सुरेश धोंडीबा कुसाळकर (वय 48, रा. विश्रांतवाडी) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. पती रामण्णा याच्यासह सासू आणि दिरावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. करूणा यांनी आत्महत्या केल्याप्रकरणात त्यांच्या आईने विश्रांतवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे पुष्कर सप्रे यांनी बाजू मांडली. तर मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड. खंडेराव टाचले यांनी काम पाहिले.
ऑक्टोबर 2020 मध्ये रामण्णा आणि मयत करूणा यांचा विवाह झाला होता. तेव्हापासून त्यांना मारहाण करत असत. मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सुरेश आणि पती रामण्णा याला अटक करण्यात आली आहे. सुरेश याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.