पुणे – आयुषमान भारत योजनेसाठी पुरेसा निधी

नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचा दावा

पुणे – “केंद्र सरकारने आरोग्य सेवेसाठी विशेषत: आयुषमान भारत योजनेसाठी पुरेसा निधी दिलेला नाही, हा समज चुकीचा आहे. ही योजना सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. यासाठी आवश्‍यक तेवढ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. आगामी काळात जसजशी ही योजना वाटचाल करेल, त्यानुसार निधीचे वाटप केले जाईल. समाजातील इतर वर्गांनादेखील या योजनेत सामावून घेणार आहे,’ अशी माहिती नीति आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य व्ही. के.पॉल यांनी दिली.

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पॉल यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना पॉल यांनी आयुषमान योजनेबाबत माहिती देत, या योजनेच्या अपयशाचे दावे खोटे असल्याचे सांगितले.

पॉल म्हणाले, “आयुषमान भारत ही आरोग्य क्षेत्रातील एक व्यापक योजना आहे. विस्तृत स्वरूपात काम होणार असल्याने या कामाचे काही टप्पे आयोगाकडून तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात समाजातील गरजू व्यक्तींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार योजनेचे कार्य सुरू असून, या योजनेला देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘

आगामी काळात या योजनेचा विस्तार वाढविणार असून, दुसऱ्या टप्प्यात समजातील इतर घटकांवरदेखील लक्ष केंद्रित करून त्यानुसार कार्य केले जाईल. त्यामुळे आयुषमान भारत योजना अपयशी ठरत असल्याचा दावा करणारे अहवाल खोटे असून, प्रत्यक्षात ही योजना अतिशय चांगल्याप्रकारे कार्यरत आहे,’ असा दावा पॉल यांनी केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.