पुणे – प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांचे आंदोलन

ऍमनोराच्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश द्या; अधिकाऱ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांना आदेश

पुणे – हडपसर येथील ऍमनोरा शाळेने वाढीव शुल्क न भरल्याच्या कारणाने विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा नाकारले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा प्रवेश मिळावा यासाठी पालक, विद्यार्थ्यांसह हडपसरच्या आमदारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश देण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांना बजाविले आहेत.

गेल्या वर्षांमधील वाढीव शुल्क न भरल्यामुळे शाळेने मार्चमध्ये 278 विद्यार्थ्यांचे टीसी थेट पोस्टानेच घरी पाठविले होते. यावर पालकांनी अनेकदा संताप व्यक्त करत शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. शाळेकडून अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी यांनी सोमवारी पुन्हा आंदोलन केले. या आंदोलनात हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्यासह 50 पालक व 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सोनल कोद्रे, धीरज गेडाम, वर्षा उणूने, हेमंत मित्तल आदी पालकांसह इतर पालकांनी या सक्रियपणे पुढाकार घेतला.

पालक, विद्यार्थ्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या मांडला होता. त्यानंतर सेंट्रल बिल्डिंगचे प्रवेशद्वारही बंद करून त्या ठिकाणी ठिय्या मांडला. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. आमदार टिळेकर यांच्यासह पालकांनी शिक्षण सहसंचालक राजेंद्र गोधने, दिनकर टेमकर, पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, सुनील माळी आदी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपले अधिकार वापरून शाळेला प्रवेशाबाबत आदेश देण्याची मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली. त्यावर अधिकाऱ्यांकडून शाळेला प्रवेश देण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले आहे.

शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी आदेश बजाविले आहेत. पालकांनी सन 2017-18 या वर्षातील 49 हजार 950 रुपये एवढी वार्षिक थकीत फी भरावी व इतर काही पालकांनी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील 67 हजार रुपयेच्या रक्कमेपैकी उर्वरित रक्‍कमचे धनादेश तारीख न टाकता शाळेत जमा करावेत. सन 2019-20 या वर्षातील फी चा पहिला हप्ताही पालकांनी शाळेत जमा करावा, असे कुऱ्हाडे यांनी आदेशात नमूद केले आहे. फी बाबत न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शाळेने खात्यावर रक्‍कम जमा करावी अथवा पालकांना परत करावी, असेही त्यात स्षष्ट करण्यात आले आहे.

पालक धनादेश घेऊन शाळेत जाणार
आता 163 विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश विषय आहे. तीन पालकांनी फीचे धनादेश तत्काळ शाळेत जमा केले आहेत. उर्वरित पालक उद्या (मंगळवार) सकाळी 9.30 वाजता धनादेश घेऊन शाळेत जाणार आहेत. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारीही उपस्थित राहणार आहेत, असे सोनल कोद्रे यांनी सांगितले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.