तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम : तंत्रशिक्षण संचालकांचे आवाहन
पुणे – तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे महत्त्वाची आहेत. शैक्षणिक वर्ष 2019-20 या प्रवेशासाठी असणारी कागदपत्रे आतापासूनच सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतूधन करण्यात येतात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासून कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी सुरुवात करा, अशा सूचना तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात अधिक माहिती “डीटीईमहाराष्ट्र’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
* उत्पन्नाचे प्रमाणपत्र
* नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
* जातीचा दाखला
* जात वैधता प्रमाणपत्र
* अधिवास प्रमाणपत्र
* खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या
* दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी प्रमाणपत्र
* अनाथ प्रमाणपत्र
* अपंगत्वाचे प्रमाणपत्र
* आधार क्रमांक व संलग्नित बॅंक खात्याचा तपशील
जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नाही
पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात, जमात, एसईबीसी वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नाही. आरक्षित जागेवरील मागासवर्गीय उमेदवाराचा प्रवेश त्याच्या जात प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन असेल. प्रथम किंवा द्वितीय वर्षातील राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवारास प्रवेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र पडतळणीसाठी संबंधित समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल.
…तर प्रवेश रद्द
विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणपत्रे जसे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते. त्यात कागदपत्रे बनावट आढळल्यास, त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असेही तंत्रशिक्षण संचालनालयकडून स्पष्ट करण्यात आले.