विश्रांतवाडी – विरोधी पक्षाच्या उमेदवाराने अहवालात राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथे राजमाता जिजाऊ यांचा पुतळा आहे, असे लिहिले आहे. प्रत्यक्षात तेथे हा पुतळा नाही. आम्हाला जिजाऊंचा फोटो ठेऊन वंदन करावे लागले. निवडून आल्यावर येथे जिजाऊंचा पुतळा उभारला जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काॅंग्रेस- महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी दिले.
वडगावशेरी मतदारसंघात पठारे यांच्या प्रचारार्थ महिला बाइक रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनींनी सहभाग घेतला. भगवे फेटे बांधून विजयाच्या घोषणा देत महिलांनी मतदारसंघात झंझावात निर्माण केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा अश्विनी महांगडे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या रॅलीत महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वडगावशेरी येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथून जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. चंदननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप झाला. मतदारसंघातील महिलांच्या असलेल्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने, स्वच्छतागृहांचा अभाव, पथदिव्यांचा अभाव असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न, पाणी प्रश्न, सोसायटीपर्यंत विविध माध्यमातून शटल सेवा मिळावी यावर महिलांनी रॅलीच्या माध्यमातून आवाज उठवला.
महिला सबलीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेणार
मतदारसंघात गेल्या १० वर्षांत महिलांच्या सबलीकरण, सक्षमीकरण, सुरक्षेसाठी कोणतेही ठोस काम करण्यात आलेले नाही. महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेले. येणाऱ्या काळात बचत गट उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी विमानतळावर जागा उपलब्ध करणे, विविध भागात स्वच्छतागृह उभारणे, महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिरांचे व विशेष प्रशिक्षण देणे ही महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे प्राधान्याने हाती घेणार आहोत, असे बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.
पठारे यांचा विजय निश्चित : महांगडे
बापूसाहेब पठारे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा. त्यांच्या विजयामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. महिलांचा “जिजाऊंच्या लेकी आम्ही जशा तळपती तलवारी, महाराष्ट्राच्या हितासाठी हाती घेतली तुतारी’ हा संदेश घरोघरी पोहोचला असून बापूसाहेब पठारे यांचा विजय निश्चित झाला आहे, असे महांगडे म्हणाल्या.