पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशी व गाड्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानकाचा विकासही होणे महत्त्वाचे असून, गाड्या वेळेत धावाव्यात, प्रवासांना सुरक्षित आणि जलद सेवा मिळावी, यासाठी प्रस्तावित पुणे रेल्वे स्टेशनच्या यार्ड रिमॉडलिंग आणि नवीन प्लॅटफॉर्मचा आराखडा नव्याने तयार केला आहे. त्यानुसार आता पुणे स्टेशन येथे नवीन दोन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून, चार प्लॅटफॉर्मचा विस्तार होणार आहे.
पुणे रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून दररोज दोनशेच्या आसपास गाड्या धावतात, तर दीड लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. पुणे रेल्वे स्टेशन हे एक जुन्या स्थानकांपैकी एक आहे. याठिकाणी सहा फलाट आहेत; पण त्यांची लांबी कमी असल्यामुळे २४ डब्यांच्या ट्रेन येथून सोडता येत नाहीत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनचे यार्ड रिमॉडलिंगचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळखात पडून आहे. या कामाला सुरुवात होणार असे वाटत असतानाच काम पुढे ढकलले जाते.
पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडलिंग (फलाट विस्तारीकरण) च्या कामाला २०१६-१७ मध्येच मंजुरी मिळाली आहे. मात्र, ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता पुणे रेल्वे विभागाकडून पुणे रेल्वे स्टेशनच्या रिमॉडलिंगच्या कामाबरोबरच प्लॅटफॉर्म वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आराखडा नुकताच रेल्वेने पूर्ण केला आहे. त्यानुसार त्याला अंतिम मजुरी घेऊन त्याची निविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात पुणे रेल्वे स्टेशनची सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
असे असेल नूतनीकरण
२४ डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफाॅर्म
– १८ ते २० डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफाॅर्म
– मालधक्काच्या बाजूने मुंबईच्या दिशेने आणखी दोन नवे प्लॅटफॉर्म
– एक प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल
– पुणे रेल्वे स्टेशन येथे दोन स्वतंत्र मुख्य लाइन