फुरसुंगी (महादेव जाधव) –उरुळी देवाची व वाडी-वस्ती परिसरात अवैध मद्य विक्री, मटका व जुगार अड्डे, रस्त्या कडेलाच खुलेआम सुरू असलेला वेश्याव्यवसाय सुरू आहे. या गैरप्रकारांमुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. दरम्यान, येथील परिस्थिती पाहता राज्य कायद्याचे, की माफियांचे? असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
उरुळी देवाची, शेवाळवाडी, मंतरवाडी, वडकी, होळकरवाडी, हांडेवाडी परिसरात हातभट्टी विक्रीचे अनेक गुत्ते आहेत. अनेक व्यावसायिक विनापरवाना दारु विक्री करत असतात. उरुळी देवाची, हांडेवाडी या काही ठराविक ठिकाणी मटका अड्डे, जुगार अड्डे सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी मद्यपी “पार्टी’ करतात. तर, चायनीज पदार्थांच्या गाड्यांवर मद्यपींचा उशिरापर्यंत आरडाओरडा सुरू असतो.
मंतरवाडी बाह्यवळण व सासवड मार्गावर लॉज उदंड झाले आहेत. येथे अवैध व्यवसायांना मुक्त वावर आहे. मंतरवाडी मार्गावर सहजीवन वाडीपासून हांडेवाडी चौक, तसेच उरुळीच्या फरशी ओढ्यापासून वडकीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वेश्या, किन्नर दिवस-रात्र उभ्या असतात. त्यामुळे आंबट शौकिनांचा वावर वाढला आहे. या परिणामामुळे महिला, मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. याबाबत कोणी संबंधितांची तक्रार केली, तर त्यालाच काही व्यावसायिक दमबाजी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
…मग आशीर्वाद कोणाचा?
उरुळी देवाची पोलीस चौकी पुणे आयुक्तालयाला जोडण्यात आल्यामुळे अवैध व्यवसाय कमी होतील, अशी आशा नागरिकांना होती. शिवाय, हद्दीत गैरप्रकार आढळल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला होता. पण, उरुळी हद्दीत मात्र हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल विचारला जात आहे.
काही भागांत अवैध व्यवसाय वाढत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही नियमित तपासणी आणि गस्तीवर असतो. काही ठिकाणी असे व्यवसाय आढळल्यास तेथे निश्चितच कारवाई करू. – दिगंबर बिडवे, सहायक पोलीस निरीक्षक