पुणे – व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश आजपासून

राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशाबद्दल अधिसूचना जारी

पुणे – बारावी व सीईटीच्या निकालानंतर आता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी मंगळवारपासून (दि.18) ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दि.21 जूनपर्यंत मुदत आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

राज्य सीईटी सेलने या चारही अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. दहावी व सीईटीचा निकाल लागला. मात्र अभियांत्रिकी शाखेचे प्रवेश केव्हा सुरू होणार आहेत, याच्या प्रतीक्षेत हजारो विद्यार्थी व पालक होते. या अभ्यासक्रमांची प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावरून उपलब्ध होतील.

दरम्यान, राज्य सीईटी सेलने चारही पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया जाहीर केली. मात्र, सायंकाळपर्यंत राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रवेशाच्या वेळापत्रकाची अधिसूचना उपलब्ध नव्हती. त्यातच राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्जास दि.17 जूनपासून सुरुवात होणार असल्याचे प्रसिद्ध केले. मात्र, सोमवारी ऑनलाइन अर्जासाठी लिंकच खुली नव्हती. त्यामुळे मंगळवारपासून अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येईल. प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उपरोक्‍त चार अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक आहे. त्यापूर्वी प्रवेशाच्या सर्व फेरीनुसार प्रवेश होणे गरजेचे आहे. दरम्यान, या चारही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना 800 रुपये, तर मागासवर्गीय गटांतील विद्यार्थ्यांना 600 रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, चारही अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळापत्रक जवळपास एकसारखे असून, या तारखांमध्ये किचिंत बदल आहेत.

सेतू सुविधा केंद्र
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध जिल्ह्यांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तथा समुपदेशन आणि मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी विविध ठिकाणी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येत आहेत. जिल्हानिहाय सेतू केंद्राची यादी राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर जाऊन लिंकवर क्‍लिक करून नावनोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर स्वत: निवडलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये प्रवेश प्रक्रिया अर्ज व त्या संबधित आवश्‍यक कागदपत्रे तपासून घ्यावीत, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

अभियांत्रिकीसह चारही अभ्यासक्रम प्रवेश वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज व निश्‍चिती : दि. 17 ते 21 जून
तात्पुरती गुणवत्ता यादी : दि.22 जून
अर्जावर हरकती स्वीकारणे : दि. 23 ते 24 जून सायं.5 वाजेपर्यंत
अंतिम गुणवत्ता यादी : दि. 25 जून रोजी
पहिल्या प्रवेश फेरीसाठी जागांची स्थिती : दि. 25 जून
पहिल्या फेरीसाठी ऑनलाइन पसंतीक्रम अर्ज : दि.26-28 जून
पहिल्या फेरीची निवड यादी : दि. 30 जून
पहिल्या फेरीनुसार प्रवेश निश्‍चिती : दि. 1 ते 4 जुलै
दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पसंतीक्रम अर्ज : दि. 6 ते 8 जुलै
दुसरी यादीची निवड यादी प्रसिद्ध : दि. 10 जुलै
तिसरी यादीसाठी पसंतीक्रम अर्ज : दि. 11 ते 13 जुलै
तिसऱ्या यादीची निवड यादी : दि. 20 जुलै
तिसऱ्या यादीनुसार प्रवेशनिश्‍चिती : दि. 21 ते 23 जुलै

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.