पुणे : करोना संसर्गाची दुसरी लाट व संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता शहरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीनं 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय लसीकरण केंद्र सुरू करावीत, अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
सद्यस्थितीत वय वर्ष 45 ते 60 या वयोमानातील लसीकरण पूर्ण शहरातील केंद्रावर सुरू आहे, पण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे वय वर्षे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करून घेण्याबाबत पुणे शहरात वेगवान पद्धतीने लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 18 ते 44 वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. यामुळे 18 ते 40 वयोगटातील नागरिकांची लसीकरण लवकरात लवकर स्थानिक पातळीवर पूर्ण करून घेण्यास मदत होईल व त्या लसीकरण केंद्रावरील आरोग्य सुविधांवरील ताण कमी होईल.
तर प्रभाग क्रमांक 39 धनकवडी आंबेगाव पठार येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे तिसऱ्या मजल्यावर नियोजनबद्ध पध्दतीने 45 ते 60 वयोमानातील वर्गासाठी लसीकरण केंद्र सुरू असून त्याच ठिकाणी वास्तुमधील अद्यावत असलेल्या चौथ्या मजल्यावरील शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे बहुउद्देशीय हॉल येथे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 18 ते 40 वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे, सर्व सोयी सुविधा युक्त या ठिकाणी फक्त 18 ते 44 वर्षे वर्गातील नागरिकांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू केल्यास लसीकरणाचा मोठा टप्पा आपण लवकर पूर्णत्वास नेऊ शकतो. यामुळे आरोग्य सुविधांवरील ताण ही कमी होण्यास मदत होईल, याबाबत आपण सकारात्मक विचार करावा अशी मागणीही तांबे यांनी केली आहे.