पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४९ एटीएम सेंटरमध्ये वीजपुरवठा खंडीत करून तब्बल १ कोटी २८ लाख ७६ हजार रुपये वळवण्यात आले. विशेष म्हणजे, भामट्याने प्रत्यक्ष बॅकेंच्या शाखांमध्ये जाऊन अर्ज करुन दिशाभूल करत हे पैसे स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतले आहेत.
या प्रकरणी टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन लिमिटेडच्यावतीने अमित मोहन चव्हाण (वय ५०, रा.ठाणे) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर रेवरे करीत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती…
स्टेट बँक ऑफ इंडियासाठी(एसबीआय) एटीएम मशीन आणि त्याच्या व्यवस्थापनाचे काम टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन ही कंपनी करते. कंपनीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ४९ एटीएम सेंटर उभारली होती. मात्र, त्यामध्ये पैसे टाकण्याचे काम दुसरी एक कंपनी करीत होती.
२०१७ पासून एटीएम सेंटरमधून तांत्रिक बिघाड झाल्याने पैसे डिलिव्हर न झाल्याचे संदेश बँकेकडे येत होते. त्यानुसार बँकेने संबंधीत ग्राहकांना ती-ती रक्कम त्यांच्या खात्यावर पुन्हा वर्गही केली. याप्रकारे बँकेने दोन वर्षांत १ कोटी २८ लाख ७६ हजार रुपये अशा अर्जदारांना दिले.
परंतु, बँकेच्या लक्षात आले की, ट्रांन्सजॅक्शन न झाल्याचा संदेश आलेल्या वेळी प्रत्यक्षात ती रक्कम एटीएम सेंटरमधून काढली गेली. यामुळे एटीएम सेंटर देखभाल करणाऱ्या टाटा कंपनीकडून एसबीआय बँकेने ही रक्कम वसुल केली.
टाटा कंपनी अधिकाऱ्यांना घेतला शोध…
बँकेने रक्कम वसूल केल्यावर हा बिघाड कसा झाला, हे टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळत नव्हते. त्यांनी बऱ्याच एटीएम सेंटरचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले की, एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येताच, तीचा विद्युत पुरवाठा काही सेकंदासाठी बंद केला जात होता. यामुळे पैसे न मिळाल्याचा संदेश बँकेला जात होता.
याप्रकरणी एक दोन सीसीटीव्ही फुटेजही कंपनीच्या हाती लागले. यामध्ये एक व्यक्ती पैसे काढताना वीज पुरवठा चालू बंद करताना दिसत आहे. यामुळे कोणीतरी जाणकार व्यक्तीने हे कृत्य केल्याचे लक्षात आले.
पोलिसांपुढे तपासाचे आव्हान…
सध्या ४९ एटीएम सेंटरपैकी निम्मे एटीएम सेंटर करार संपल्याने बंद झाले आहेत. यामुळे तांत्रिक तपासात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पैसे वर्ग करुन घेतलेली बँक खाती सरू आहेत की बंद आहेत, हा ही तपासात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. घटना २०१७ पासूनची सहा-सात वर्षांपूर्वी घडल्याने भामट्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले तरी त्याच्या चेहरे पट्टीत बदल झालेला असेल. यामुळे भामट्याला शोधणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे.