पुणे – एसटी चालकांना डोळे तपासणी सक्‍तीचे

दर वर्षाला डोळ्यांची आणि आरोग्य तपासणी करण्याचा महामंडळाचा निर्णय


तपासणीसाठी एका दिवसाची पगारी रजा मिळणार

पुणे – विना अपघात आणि विना खंडित सेवा अशी एसटी महामंडळाची प्रतिमा आहे. ही प्रतिमा आणखी उंचाविण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील सर्व चालकांची दर वर्षाला डोळ्यांची आणि आरोग्य तपासणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. हा नियम सर्व वयोगटातील चालकांसाठी बंधनकारक असणार आहे. ही तपासणी सरकारी रुग्णालयात करून घ्यावी लागणार आहे, या नियमांचे पालन न केल्यास त्याला मार्गावर पाठविण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश महामंडळाने दिले आहेत. त्यासाठी या चालकांना एका दिवसाची पगारी रजा देण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत काही छोट्या आणि मोठ्या अपघातांचा अपवाद वगळता प्रवाशांना विना अपघात सेवा देण्यास महामंडळाच्या चालकांना यश आले आहे. त्यामुळे एसटीच्या बसेसने बिनधास्त प्रवास करता येतो, अशी सर्वसामान्य प्रवाशांची भावना आहे. मात्र, सततच्या प्रवासामुळे चालकांच्या डोळयावर ताण येत असल्याचे आणि त्यातूनच त्यांना डोळ्यांचे आजार उद्‌भवत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. महामंडळाच्या ताफ्यात सध्या 35 हजार चालक आहेत. या चालकांसाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्व आगारांमध्ये तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यातील बहुतांशी चालकांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरातील सर्व चालकांना डोळे तपासणी करून त्याचा अहवाल संबंधित आगार प्रमुखांना सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी त्याबाबतचे परिपत्रक सर्व प्रादेशिक कार्यालयांना पाठविले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×