पुणे – वाहक पदासाठी चक्‍क द्विपदवीधर उमेदवार!

बेरोजगारीचे दाहक वास्तव एसटी भरतीमुळे उजेडात

पुणे – राज्यातील बेरोजगारांची संख्या किती झपाट्याने वाढत आहे, याचे दाहक वास्तव पुन्हा एकदा उजेडात आले आहे. एसटी महामंडळाने सुरू केलेल्या भरती प्रक्रियेच्या 5 हजार पदांसाठी तब्बल सव्वा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये पुणे विभाग एकदा आघाडीवर आहे. धक्कादायक म्हणजे, यातील वाहकांच्या पदासाठी चक्क द्विपदवीधर, उच्चशिक्षित आणि इंजिनिअर उमेदवारांचाही समावेश आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने वाहक आणि चालकांच्या 5 हजार पदांसाठी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद-240, जालना-5226, परभणी-203, अमरावती-230, अकोला-533, बुलढाणा-472, यवतमाळ-171, धुळे-268, जळगांव-223, नाशिक- 112, सोलापूर-112 आणि पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे 1 हजार 647 जागा भरण्यात येणार असून 18 जानेवारी पासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दि.8 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.

वाहक पदासाठी दहावी पास, पी.एस.व्ही. बॅच आदी पात्रता ठरविण्यात आली होती. या जागा आरक्षणानुसार आणि नव्याने आर्थिक घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या आरक्षणानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्याशिवाय सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या दुष्काळी भागातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचा निर्णय एसटी महामंडळ आणि राज्य शासनाने घेतला होता, त्यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्वत: घोषणा केली होती.

यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले, “या जागेसाठी पात्रता ठेवण्यात आली असली त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेला उमेदवारही त्यासाठी अर्ज करू शकतो. सर्व निकष पाहूनच उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.’

दुष्काळी भागातील उमेदवार सर्वाधिक
वाहक पदासाठी दहावी उत्तीर्णची अट असतानाही या पदासाठी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये मराठवाडा, खान्देश, विदर्भ तसेच राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्‍यांतील उमेदवारांचा सर्वाधिक भरणा आहे. या विभागातील उच्चशिक्षित उमेदवार सर्वाधिक आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)