पुणे -लांब पल्ल्याच्या अंतरावर एसटी ला थांबे दिलेल्या हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि तेथील सोयीसुविधाबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे राज्य परिवहन प्रशासन जागे झाले असून एसटी थांबे देण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
थांब्यासाठी नवीन हाॅटेलला आता एका वर्षासाठी परवाना देण्यात येणार आहे. त्यानंतर तेथील सेवा-सुविधाचा आढावा घेऊन अहवाल सकारात्मक असल्यास परवाना दोन वर्षासाठी वाढविण्यात येणार आहे. राज्य परिवहनच्या माहितीनुसार जेवणाची गुणवत्ता, स्वच्छता आणि प्रवाशांना दिलेल्या सेवेच्या आधारे परवाना टिकवा, हे सूत्र याबाबत अवलंबण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अलिकडेच पुणे-पंढरपूर दौऱ्यावर असताना सोलापूर मार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना भेट दिली. तेथे प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे एसटी प्रशासन खडबडून जागे झाले. हॉटेल थांब्याच्या ठिकाणी सर्व सोई-सुविधा पुरविण्याचे आदेश दिले होते. मात्र, परिवहन मंत्र्यांनीच आता यापुढे हॉटेल थांब्यांना वर्षासाठी परवाना देताना नवी आचारसंहिता लागू केली आहे.
यापुढे नवीन हॉटेल थांब्याना तीन वर्षासाठी परवानगी दिली जाईल. पहिल्या टप्यात ही परवानगी वर्षासाठी असेल. त्यानंतर संबंधित थांब्यावरील सेवा समाधानकारक असेल तरच पुढील दोन वर्षांसाठी परवाना वाढवला जईल. सेवा-सुविधा समाधानकारक नसल्यास परवाना रद्द केला जाण्याची अट आहे. हाॅटेल व्यावसायिकांना परवाना टिकविण्यासाठी आता प्रवाशांना गंभीरपणे योग्य सेवा-सुविधा द्याव्या लागणार आहेत.
थांबे निवडण्याचे नवे निकष
-थांब्याची निवड करताना स्वच्छता, अन्नपदार्थ दर्जा आणि बसची पार्किंग व्यवस्थेला प्राधान्य
– थांब्याची शिफारस करताना संबंधित आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी, विभाग नियंत्रकांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करावी
– त्यांच्या पाहणी अहवालाच्या आधारे संबंधित थांब्याला मंजुरी
– भविष्यात थांब्याबाबत तक्रारी आल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई.
– संबंधित हॉटेलने महामंडळाची फसवणूक केल्यास गुन्हा दाखल होणार
– मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी थांब्याची तपासणी