बिबवेवाडी – मागील अनेक महिन्यांपासून सदर क्रीडा संकुल वाढदिवस, पार्टी, सांस्कृतीक कार्यक्रम, गेट टूगेदरसाठी इतर अनेक क्लासेससाठी भाड्याने देत असल्याची तक्रार ‘नमस्कार प्रतिष्ठान’ने महापालिकेकडे केली आहे. परंतु, त्यानंतरही संबंधीत अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. क्रीडा संकुल नेमके कशासाठी? असा प्रश्न यातून उपस्थित होऊ लागला आहे.
सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाबाबतचा गैरकारभार ‘प्रभात’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करू, संबंधीतांवर कारवाई करू अशी आश्वासने पालिका अधिकाऱ्यांकडून नागरिकांना देण्यात आली होती. परंतु, याबाबत कुठलीही कारवाई झाली नसल्याने आता पुन्हा क्रीडा संकुल भाडेतत्वावर दिले जात असल्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार ‘नमस्कार प्रतिष्ठान’ कडून थेट आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. याबाबत संबंधीत विभागास निवेदन देण्यात आल्यानंतरही कार्यवाही झालेली नाही.
क्रिडा विभागात मनुष्यबळ कमी असल्याची माहिती खात्याअंतर्गत देण्यात येत आहे. मात्र, महानगरपालिकेच्या क्रीडा संकुलात संध्याकाळनंतर पार्टा व कार्यक्रम होत असताना अधिकारी फक्त माहिती घेतात, याबाबत कार्यवाह मात्र काहीच होत नसल्याची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात वैयक्तिक स्वरूपाचे कार्यक्रम होत असल्याबाबत माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. याची संपूर्ण माहिती घेण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त (विशेष), महानगरपालिका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात कार्यक्रम होत असल्याचे समजले. क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी तेथे गेले असता संबंधित व्यक्तीचे नाव मिळाले असून त्यांना नोटीस पाठविणार आहोत. संध्याकाळनंतर तेथे सुरक्षारक्षक नसतो, त्यामुळे असे प्रकार घडत असून यापुढे संध्याकाळनंतर संकुलास कुलूप लावण्यात येईल.
– संतोष वारूळे, उपायुक्त, क्रीडा विभाग, महानगरपालिका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात शुल्क घेऊन कराटे, डान्स व इतर क्लासेस घेतले जातात. क्रीडा संकुलामध्ये अनेक कार्यक्रम जल्लोषात होतात. सदर प्रकरणाची चौकशी करून भाडे कोण घेत आहे. याबाबत कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.
– निखिल शिंदे,
अध्यक्ष नमस्कार प्रतिष्ठान