बिबवेवाडी, (हर्षद कटारिया) – महापालिकेची 76 क्रीडा संकुल शहरात असून, त्यापैकी फक्त 7 संकुल भाडेकरारावर दिलेली आहेत. अन्य संकुल भाडे करारावर देण्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याने 69 क्रीडा संकुल कशी काय सुरू होती? शुल्क आकारून येथील सुविधा नागरिकांना देण्यात येत असतील तर क्रीडा विभागांतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे.
याच कारणातून संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाली असून, आता कारवाईऐवजी अधिकाऱ्यांसह संबंधितांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
क्रीडा संकुलातील कथित गैरव्यवहाराबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रकाशित होताच अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्याही करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर संकुल भाडेतत्त्वावर देण्याबाबतच्या निविदा प्रक्रियेने वेगही घेतला.
ही सर्व सारवासारव झाल्यानंतर गुरुवारी (दि.16) क्रीडा उपायुक्त संतोष वारुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची पाहणी केली. परंतु, आपल्याला काहीच आढळले नसल्याचा निर्वाळा उपायुक्तांनी दिला. त्यामुळे शुल्क आकारणीसह सदर क्रीडा संकुलातील वास्तव स्थितीचे व्हिडिओ “प्रभात’कडून सादर करण्यात आले. त्यामुळे सदर प्रकार गंभीर व धक्कादायक असून, या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्तांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात पथकासह पाहणी केली. “प्रभात’कडून मिळालेली माहिती धक्कादायक असून, यावर सखोल चौकशी करण्यात येईल. शहरातील सर्व क्रीडा संकुलाची माहिती घेत असून, क्रीडा संकुल भाडेतत्त्वावर देण्याबाबत नवीन निविदा प्रक्रियाचे काम वेगाने सुरू आहे.
– संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा विभाग, मनपा