सहकार नगर(हर्षद कटारिया, प्रतिनिधी) – तळजाई येथील रामदेवबाबा क्रीडा संकुल मधील गैरप्रकार बाबत दैनिक प्रभातने सत्य प्रकार समोर आणल्या मुळे पालिकेच्या क्रिडा विभागाचा गलधान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महानगरपालिका कडून सदर क्रीडा संकुल सिल करण्यात आले. मात्र, आता सहकार नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल बाबत सुध्दा अश्याच चुकीच्या बाबी समोर येत असल्या मुळे पुणे महानगपालिकेच्या आयुक्तांनी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन पुणे शहरातील सर्व क्रीडा संकुलाची चौकशी करण्याची गरज आहे.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव माझ्याकडे अकरा महिने किंवा नवीन निविदा प्रक्रिया ह्यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंतच म्हणजेच २४/११/१७ ते २४/१०/१८ कालावधी मध्ये भाडेतत्वावर चालवण्यास दिला होता मी पुणे महानगरपालिकेकडे तसा करारनामा करून ११ महिन्याचे भाडे पूर्ण भरले आहे.त्याबाबतची सर्व कागदपत्रे ही माझ्याकडे आहेत. महापालिकेने तूर्तास नवीन टेंडर प्रक्रिया राबवून त्यास आयुक्त यांची मान्यता सुद्धा घेतली होती तदनंतर आज ३ वर्षांनपर्यंत ते पूर्ण क्रीडासंकुल कोण चालवतंय, कोणाचा ताबा आहे हे महापालिकेलाच माहिती असेल.कोणीतरी हेतूपरस्पर प्रशासनाची दिशाभूल करताना दिसत आहे प्रशासनाने चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा.
– गणेश गांधी (ठेकेदार)
पालिकेच्या क्रिडा संकुलांचे ताबे नक्की कोणाकडे आहेत नागरिकांन कडून मासिक शुल्क स्वीकारत पैसे नक्की कोणाच्या खिशात जात आहेत. क्रीडा संकुल भाडे करारावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असताना वर्षांनुवर्षे मलईदार ताबे कोणाच्या जिवावर संबधित इसम ठेवतात याचे गौडबंगाल काय? अश्या चर्चेला उधाण आले आहे.
“आंबेडकर क्रिडा संकुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना पहिल्यांदाच पुणे मनपाच्या वतीने सदरचा क्रीडा संकुल चालविण्यात येत होते. परंतु 2017 नंतर भाजपची सत्ता आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. महिना दीड लाख रुपये द्यायचे संबंधित ठेकेदाराने भरलेली निविदा स्थायी समिती व मुख्य सभेने भाजप पक्षाच्या बहुमताच्या जोरावर फेटाळण्यात आली. त्यामुळे तीन वर्षे पुणे मनपा ला त्याचे कोणतेही उत्पन्न न मिळता नागरिकांना सुद्धा अल्पदरात क्रिडा संकुल उपलब्ध होत नाही. महापालिकेने आता तरी त्याची योग्य ते प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना अल्पदरात तेथील सुविधा उपलब्ध करून द्यावी.
– नितीन कदम (अध्यक्ष, पर्वती मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
संबधित संकुलात भ्रष्टाचार होत आहे का?त्या मध्ये कोणा- कोणाचा सहभाग आहे ह्या बाबत चौकशी होण्याची गरज आहे. अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल गांधी या ठेकेदारास चालविण्यास दिले होते त्या बाबत मला पुढील माहिती नाही
– महेश वाबळे (नगरसेवक, भाजप)
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी रंजना घगे, उपायुक्त क्रिडा विभाग पुणे महानगपालिका. यांना वारंवार फोन व मेसेज करूनही त्यांनी फोन उचलला नाही.