कोंढवा – हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. मतदारसंघातील दिग्गज निष्ठावंत शिवसैनिक व माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या रूपाने सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्धार करीत बधे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. कोंढवा बुद्रूक परिसरामध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेत जागोजागी स्थानिक नागरिकांनी उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंबा दिला.
कोंढवा बुद्रुक गावठाण, लक्ष्मी नगर, काकडे वस्ती, सर्व नंबर पाच आश्रफनगर, संत ज्ञानेश्वर नगर, कान्हा चौक, टिळेकर नगर, पाण्याची टाकी, कान्हा चौक, गोकुळनगर, साईनगर या ठिकाणी गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य पदयात्रा रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी माऊली कामठे, मधुकर दांडेकर, दादा दांडेकर, सचिन निंबाळकर, मधुकर मरळ, रामदास कामठे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी अनेक नागरिकांनी गंगाधर बधे यांना घरामध्ये बोलावून त्यांना समस्या सोडवण्याची विनंती केली.
पदयात्रा दरम्यान मतदार बाबुशेठ अडसूळ यांनी सांगितले की, गंगाधर अण्णा बधे हे मागील वीस वर्षांपासून कोंढवा परिसरामध्ये सामाजिक काम करतात. अनेक गरीब व कष्टकरी लोकांना त्यांनी मदत केली आहे. मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा आणि कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो सर्वांना आपला माणूस म्हणून त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे गंगाधर बधे यांना या परिसरातून मोठे मतदान होइल.