पुणे – लघुलेखन (शॉर्ट हॅंड) परीक्षेच्या निकालाचे स्पेलिंग मिस्टेक झालेली प्रमाणपत्रे वाटप झाल्याने गोंधळ उडाला होता. अखेर चूक दुरुस्त करून प्रमाणपत्रांची पुन्हा छपाई करण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर ओढवली आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या लघुलेखन परीक्षेचा ऑनलाइन निकाल 24 जून रोजी जाहीर झाला. निकालाच्या प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात आले. मात्र, त्यात परीक्षेच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक झाल्याची बाब शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्था, विद्यार्थी यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे ही प्रमाणपत्रे जमा करून घेण्यासाठी धांदल उडाली.
परीक्षांचा ठेका असलेल्या संबंधित एजन्सीकडून पुन्हा नवीन 5 हजार प्रमाणपत्रांची छपाई करून घेण्यात आली आहे. आता ती दोन दिवसांत स्पीड पोस्टाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ती वाटप होणार आहे, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.
दरम्यान, लघुलेखन परीक्षेच्या प्रमाणपत्रात झालेली चूक ही गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य टंकलेखन संगणक टायपिंग संस्थेच्या हेमंत ढमढेरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.