पुणे – भरधाव कारने तीन ते चार वाहनांना उडवल्याची घटना सूस- पाषाण रस्त्यावर घडली. अपघातानंतर कारचालकास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर कारचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. चालकाने मद्यप्राशन केले आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे.
या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी ३ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तसेच चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने अपघातानंतर सूस- पाषाण रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांनीही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
अपघातानंतर स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ग्लॉस्टर गाडी वेगात येत असताना तिचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरच्या इतर गाड्यांना धडक बसली. यामध्ये चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, संतप्त जमावाने गाडीवर दगडफेक केली. संबंधित वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, चालक गाडी थांबवत नव्हता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक बाणेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या चालकाला ताब्यात घेतले. चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय आहे. सध्या पोलिसांनी चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.