पुणे : एनडीए रस्त्यावरील पुणे वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्ष्यांसाठी, विशेषकरून मोठ्या आकाराच्या पक्ष्यांसाठी विशेष असे नवीन उपचार केंद्र (एनक्लोजर) उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. त्याच्या उभारणीसाठी पुण्यातील श्रुती आणि सर्वेश जावडेकर या दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला असून, प्रकल्पाच्या उभारणीसाठी ५० लाख रुपयांची देणगी उपचार केंद्राचे व्यवस्थापन पाहणाऱ्या रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचे मोहिते यांनी सांगितले.
पक्ष्यांसाठी असलेल्या उपचार केंद्रामध्ये ३२ युनिट्सची सोय असेल. प्रकारानुसार एका वेळी १५० ते २०० पक्ष्यांना सामावून घेण्याची या नवीन उपचार केंद्राची क्षमता असेल. सध्या या वन्यप्राणी उपचार केंद्राची क्षमता ही एका वेळी साधरणतः १०० पक्षांसाठी आहे. या नवीन केंद्रामुळे ही क्षमता ३०० पक्षी एका वेळी सांभाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी माहिती रेस्क्यूच्या व्यवस्थापिका नेहा पंचमिया यांनी सांगितले.
एका अंदाजानुसार भारतात सापडणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ६० टक्क्यांहून अधिक प्रजाती या दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या परिसंस्थेत पक्ष्यांना मोठे स्थान असल्यामुळे पुणे वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात उभारल्या जाणाऱ्या नव्या केंद्राच्या निर्मितीला हातभार लावावा, असे आम्हाला वाटले आणि त्यादृष्टीने आम्ही रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदत करत आहोत, असे जावडेकर म्हणाले.
या उपचार केंद्रामध्ये नवजात पक्ष्यांसाठी उपयुक्त अशा २ एव्हीयन नर्सरी देखील निर्माण केल्या जातील, तसेच उपचारानंतर पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याआधी त्यांची उडण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी गरजेचा असलेल्या फ्लाइंट टेस्टिंग एरीया देखील या उपचार केंद्राच्या रचनेतील एक महत्त्वाचा भाग असणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम येत्या ६ ते ८ महिन्यांत पूर्ण करण्यावर भर असेल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. सर्वेश हे बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून, श्रुती या वास्तुविशारद आहेत.