पुणे : एसटीच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या बस येणार आहेत. यात पहिल्या टप्यात ठाणे, धाराशिव, पालघर आणि बुलढाणा या विभागांना बसेस मिळाल्या आहेत. तर पुढील दोन आठवड्यांत पुणे विभागात शंभर नवीन बस दाखल होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली. या सर्व लालपरी प्रकारच्या बस असण्याची अपेक्षा आहे.
राज्य सरकारच्या विविध सवलतींच्या योजनेमुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत. परंतु, बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महामंडळाकडून नव्याने दोन हजार बस खरेदी करण्यात आल्या असून, टप्याटप्याने या बस ताफ्यात दाखल होत आहे.
पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या बस कोकण आणि मराठवाड्यातील काही आगारांना देण्यात आल्या आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागाला बस मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. शिवाय पुणे विभागात प्रवाशांची संख्या जास्त आहे. तुलनेने बसेसची संख्या कमी असल्यामुळे नियोजन करताना ताण पडत आहे.
नव्या गाड्या विभागात दाखल झाल्यावर सर्व आगारांना १५ या प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.