पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये सीमेवरील जवानांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने “सी-डॅक’च्या मदतीने इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेट पोस्टल बॅलेट सीस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित केली. या प्रणालीद्वारे जवानांना ई-मेलद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. ई-मेलची प्रिंट काढून जवान मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविली. या मतपत्रिकेवर बारकोड क्रमांक होता.तसेच, सांकेतिक क्रमांक सुद्धा होता.
मतमोजणीच्या वेळी या मतपत्रिकेचे स्कॅनिंग करून त्याची पडताळणी करण्यात आली. यावेळी संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने टपाली मतपत्रिका मोजण्यास काही वेळ लागला. देशपातळीवर ही समस्या निर्माण झाल्याचे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यानंतर प्रशासनाकडून मतपत्रिकेवर असलेल्या 40 अंकी क्रमांकावरून याची पडताळणी करून मतमोजणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.