पुणे – मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून इंटरसिटी गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. अखेरीस मध्य रेल्वेने पुणे-सोलापूर गाडी सोडण्याचा निर्णय घेतला असून, पुणे-सोलापूर-पुणेदरम्यान धावणारी एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. तर, कोल्हापूर-नागपूर विशेष एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
1 मार्चपासून पुणे-सोलापूर एक्स्प्रेस शनिवार आणि रविवार वगळता दर सोमवार ते शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी पुण्याहून सायंकाळी 6.10 वाजता सुटणार असून, सोलापूर येथे रात्री 10 वाजता पोहोचणार आहे. तर, सोलापूर-पुणेदरम्यान धावणारी गाडीदेखील शनिवार आणि रविवार वगळता दर सोमवार ते शुक्रवार धावणार आहे.
ही गाडी सोलापूरहून सकाळी 6.30 वाजता सुटणार असून, सकाळी 10.30 वाजता पुणे येथे पोहोचणार आहे. ही गाडी दौंड आणि कुर्डूवाडी स्थानकांवर थांबणार आहे. यासह कोल्हापूर-नागपूर द्वी साप्ताहिक विशेष गाडी 12 मार्चपासून दर सोमवारी आणि शुक्रवारी, नागपूर-कोल्हापूर द्वी साप्ताहिक विशेष गाडी 13 मार्चपासून दर मंगळवारी आणि शनिवारी धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.