वाघोली (प्रतिनिधी) –पाणी, रस्ता तसेच मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत वाघोलीतील सोसायटीधारक आक्रमक झाले असल्याचे शुक्रवारी (दि. 20) पाहायला मिळाले. बकोरी फाटा ते वाघोली महापालिका कार्यालयापर्यंत पायी निषेध रॅली काढून स्थानिक आमदार, खासदार, महापालिका व पीएमआरडीए आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वाघोलीत महापालिकेच्या कार्यालयातच आयुक्तांना भेटण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन संपले.
वाघोलीचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी पाणी, रस्ता, कचरा, वाहतूक कोंडी, ड्रेनेज अशा विविध मुलभूत सुविधा मिळण्यासाठी वाघोलीतील सोसायटीधारकांनी प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही सुविधा मिळत नसल्याने वाघोली येथे पीएमआरडीए व पुणे महापालिकेविरोधात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
“पाणी, रस्ता व मुलभूत प्रश्नांवरून नागरिक आक्रमक झाले असून या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांना न्याय द्यावा”.
-जयप्रकाश सातव पाटील, नेते भाजपा पुणे जिल्हा
मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करीत बकोरी फाटा येथून रॅलीला सुरुवात झाली. आयव्ही इस्टेट येथील अपघाती वळणावर अपघातात मृत्युमुखी पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर आमदार, खासदार, आयुक्त, अधिकारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर वाघोली येथे महापालिका कार्यालयात मोर्चा धडकला. कार्यालयाच्या आतमध्येच आंदोलनकर्ते ठाण मांडून बसले व महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी बोलवा अन्यथा आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली.
वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर अधिकारी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले असता पालिका अधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. गंभीर वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. तासभर सुरु असलेल्या घडामोडीनंतर सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी सहा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस चौकी येथे आणले. त्यानंतर माहिती घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.