पुणे – महापालिका पुणेकरांना दैनंदिन स्वरुपात विविध सेवा पुरवते. या सेवांची जनजागृती तसेच विकासकामांची माहिती आता सोशल मीडियावर झळकणार आहे. त्यासाठीची जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांवर देण्यात आली असून, महापालिकेच्या कामांच्या प्रसिद्धीसाठी स्वतंत्र सोशल मीडिया कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहेत. त्यामुळे उशिरा का होईना पण स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेली महापालिका सोशल मीडियावर सक्रीय होणार आहे. त्याचा पुणेकरांनाही फायदा होणार आहे, असा महापालिकेचा उद्देश आहे.
महापालिकेच्या दैनंदिन सेवांची माहिती अनेक नागरिकांना नसते. तसेच पालिकेकडूनही त्याबाबत जनजागृती केली जात नाही. त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. तर, नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून पालिकेच्या सेवांबाबत तक्रारी करतात. मात्र, नागरिकांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे काम करूनही महापालिकेस नागरिकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडूनही सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या सर्व विभागांनी नागरिकांच्या उपयोगाची सर्व माहिती, सुरू असलेल्या योजना, प्रकल्प, जाहीर कार्यक्रम, जाहीर प्रकटन, व्हिडिओची माहिती सोशल मीडिया तसेच डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक विभाग प्रमुखावर आहे.
ही माहिती कशा स्वरूपात द्यावी, कोणती माहिती द्यावी याची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचे पालन करून सर्व विभाग प्रमुखांनी सोशल मीडियावर सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.