पुणे – धनकवडीतील चैतन्यनगरमध्ये एकाच रात्री सहा सदनिका फोडण्यात आल्या. यातील एका सदनिकेतून 29 हजाराचा ऐवज चोरण्यात आला. तर इतर पाच सदनिका फोडण्याचा प्रयत्त केला असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे यातील काही सोसायटीमध्ये रखवालदार आहे. ही घटना नऊ तारखेला सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी तानाची माधवराव जगदाळे(61 ) हे चैतन्यनगरमधील गुरुदत्ता हौसिंग सोसायटीमध्ये रहातात. त्यांच्या सननिकेचे सेफ्टी डोअर व आतील दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरटयांनी आत प्रवेश केला. यानंतर लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कपडे व चांदीची भांडी असा 29 हजाराचा ऐवज चोरुन नेला. यानंतर त्यांच्या बाजूच्याच निवृत्त अपार्टमेंटमधील श्रीकांत वैद्य यांची सदनिका तोडून चोरीचा प्रयत्न झाला.
याच्या पुढेच असलेल्या अनंतनगर सहकारी गृहरचना सोसायटीमधील अभिजित मुडवीकर, रमेश कुंटे, दिपक गोहाड व योगेश बदी यांच्या सदनिकांचे सेफ्टी व मेन डोअर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतरांच्या सदनिकेतून ऐवज चोरण्यात आला का नाही हे प्रत्यक्षात सदनिका मालक आल्यावर कळेल असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
यातील काही सदनिकांमध्ये सुरक्षा रक्षक आहेत. मात्र त्यांची नजर चुकवून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक चोरांच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली.