पुणे: मावळातून सहा गुन्हेगार तडीपार

वडगाव मावळ (प्रतिनिधी): येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमधील सहा गुन्हेगारांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ, हवेली, पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, मुळशी व खेड आदी हद्दीमधून हद्दपार केले आहे. अशी माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली आहे.

वडगाव पोलीस ठाण्यातील मंगेश भीमराव मोरे (वय 25, रा. वडगाव, ता. मावळ (टोळीप्रमुख), विशाल ऊर्फ मोग्या तानाजी मोढवे (वय 19, रा. वडगाव), आकाश अंकुश चिमटे (वय 19, रा. कुसवली, ता. मावळ), मयूर ऊर्फ चन्या बजरंग मोढवे (वय 24, रा. वडगाव), निखिल काजळे (वय 19, रा. वडगाव), संभाजी दत्तात्रय भिलारे (वय 20, रा. वडगाव) या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. हा आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.

या सहा जणांची टोळी असून, दहशत निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, हाणामारीसह दुखापत यासारखे गुन्हे ही टोळी मावळ तालुक्‍यामध्ये करीत असून, त्याला व्यावसायिक स्वरूप दिले आहे.

त्यामुळे बऱ्याच बेरोजगार मुलांनी टोळीचा आश्रय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे नुकसान होत आहे. अशा कृत्यांना आळा बसावा म्हणून या सहा गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हे सहा जण हद्दपार केलेल्या क्षेत्रामध्ये आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.