पुणे – जिल्ह्यात करोनाबाधित आणि मृत्यू संख्येत मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात लक्षणीय घट झाली आहे. सततच्या घटत्या आलेखामुळे पुणे जिल्ह्यातील अडीच टक्क्यांवर पोहचलेला बाधित दर तब्बल 1.7 टक्क्यांपर्यंत खाली आला.
मात्र, जूनच्या अखेरीस हा वेग मंदावल्यामुळे पंधरा दिवसांत मृत्यू दरामध्ये घट झालेली दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीणमधील मृत्यूदर कमी करणे आरोग्य विभागापुढील मोठे आवाहन आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये करोनाची दुसरी लाट पुणे जिल्ह्यात वेगाने सुरू झाली. एप्रिल महिना हा “हॉटस्पॉट’ ठरला आहे. मे महिन्यात बाधित संख्या कमी झाली मात्र, मृत्यू संख्या घटत नसल्यामुळे चिंता आणखीन वाढली.
मागील दोन महिन्यांतील जिल्ह्यातील बाधित आणि मृत्यू संख्या पाहिली तर 20 ते 26 मेदरम्यान सर्वाधिक 606 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर, 22 हजार 115 बाधित सापडले. या आठवड्यात जिल्ह्यातील मृत्यूदर 2.7 टक्के इतका होता.
हा वाढता मृत्यूदर साधारण 9 जूनपर्यंत होता. 3 ते 9 जूनदरम्यान जिल्ह्यात बाधित संख्या निम्म्याने घटली. 9 हजार 555 नवीन बाधित सापडले. मात्र, मृत्यूदर 3 टक्क्यांवर पोहचला होता.