पुणे -पुणे बाजार समिती प्रशासनाने प्रस्तावित अद्ययावत बाजार उभारणीसाठी ठेवलेला सुमारे 70 कोटी रुपयांचा प्लॉट काही आडत्यांना किरकोळ भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया केली आहे. भूखंड वाटपाची पत्रेही संबंधितांना मिळाली असून, आपल्या पदरात भूखंड पाडण्यासाठी कोट्यवधींच्या रकमेची बोली लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, बाजार समितीची निवडणूक 29 एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याची बाजार घटकांमध्ये चर्चा आहे.
मार्केट यार्डातील फळ बाजारात काही मोजक्या आडत्याना डाळिंब विक्रीसाठी शेड दिले आहे. काही वर्षांनंतर इतर आडत्यानीही डाळींब विक्रीसाठी अतिरिक्त जागेची मागणी लावून धरली. गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी बाजार समितीने चार नंबर गेटलगत न्यायप्रविष्ट जागेत डाळिंब यार्ड बांधण्याचा घाट घातला होता. मात्र, माध्यम प्रतिनिधींनी हा बेकायदा डाळिंब यार्डचा प्रकार बातम्यांच्या माध्यमातून उघडकीस आणल्यानंतर ते काम बंद केले गेला. आता समितीने चक्क सध्या सुरू असलेल्या पार्किंगची जागा निवडली आहे. ही जागा मार्केटयार्ड मुख्य प्रवेशद्वार समोरील सं. नं 559 अ/2 ब/2 1 हेक्टर 34 आर म्हणजे सुमारे तीन ते सव्वा तीन एकर जागा आहे.
या जागेत काय करायचे यासाठी समितीने आडते आणि दी पूना मर्चंट चेंबरच्या पदाधिकारी यांची दोन महिन्यांपूर्वी बैठक घेतली. त्यात या जागेवर अद्ययावत बाजार उभारण्याचे निश्चित झाले. यासाठी बाजार समितीने वास्तुविशारदाची नेमणूक केली असून याबाबत अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, संबंधित प्लॉटवर व्यापार करण्यासाठी पणन विभागाची ले-आऊटला मंजुरी घेणे तसेच, तेथे बांधकाम केले जाणार असल्याने महापालिकेची परवानगीदेखील आवश्यक असणार आहे. मात्र, ही परवानगी घेतली की नाही, याबाबत समजले नाही. याबाबत प्रशासक मधुकांत गरड यांनीही प्रतिसाद दिला नाही.