पुणे – दुकानांवर जाहिरातीचे बोर्ड, होर्डिंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क महापालिकेने प्रतिचौरस फूट १११ रुपयांवरून थेट ५८० रुपये इतका वाढवले आहे. यास व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. जे होर्डिंगधारक न्यायालयात गेले, त्यांच्याकडून प्रतिचौरस फूट १११ रुपयेप्रमाणे शुल्क आकारण्यात येते. मात्र, जे न्यायालयात गेले नाहीत त्यांच्याकडून ३१ मार्चपासून २२२ रुपयांप्रमाणे कर आकारला जात आहे.
सन २०२४-२५ या वर्षाचे शुल्क भरण्यास व्यापारी गेले असता, संबंधित अधिकारी ५८० रुपये दर आकारात आहेत. याबाबत धोरण ठरविण्यासाठी १४ आॅगस्ट रोजी व्यापाऱ्यांची बैठक बोलाविली आहे, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी मनपाचे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार व सध्याचे आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले तसेच अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांना वेळोवेळी लेखी निवेदन देत प्रति चौरस फुटास २२२ रुपये कर आकारण्याची मागणी केली. परंतु प्रत्येक वेळी बैठक बोलावण्याचे केवळ आश्वासनच देण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
राज्य सरकारच्या धोरणानुसार बहुतांशी दुकानदारांनी मराठीत नामफलक लावले. जीएसटी नंबर लिहिण्याचे सक्तीचे असल्याने आम्ही ते देखील नाम फलकात समाविष्ट केले. परंतु शासनाने नामफलकाची उंची ३ फूट मर्यादित केली आहे. यावर दुकानाएवढी लांबी ठेवल्याने दुकानदाराला अडचण येत आहे. नामफलकाची उंची वाढत असल्याने वाढीव फलकाच्या क्षेत्रफळाला ५८० रुपये प्रमाणे मागणी केली जात आहे, असेही रांका म्हणाले.