स्टॅम्प घोटाळ्याने पुणे हादरले

अख्खे कुटूंब गजाआड : 68 लाख रुपयांचे स्टॅम्प हस्तगत


शनिवारवाड्याजवळील इमारतीत कारवाई


बनावट शिक्‍के मारून केली जात होती फसवणूक


2017, 2018चे स्टॅम्प पेपर सापडल्याने खळबळ

पुणे – विश्रामबाग पोलिसांनी शनिवारवाड्याजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट बिल्डिंगमधून तब्बल 68 लाख 38 हजार 170 रुपये किंमतीचे 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर जप्त केले आहेत. याप्रकरणी आई, वडील आणि मुलगा अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपिक कोषागाराकरिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर तो मारून हा घोटाळा करण्यात येत होता. दरम्यान, या प्रकरणाने पुणे शहर पुरते हादरले आहे.

याप्रकरणी चिन्मय सुहास देशपांडे (26), सुहास मोरेश्‍वर देशपांडे (59) आणि सुचेता सुहास देशपांडे (54, तिघे रा. 183, कसबा पेठ, पारसनीसवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय विश्‍वनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. देशपांडे दाम्पत्य मुलासह कोषागार कार्यालयातून स्टॅम्प काढूननंतर त्यावर बनावट शिक्‍क्‍याचा वापर करून ते स्टॅम्प पेपर ब्लॅकने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्‍त सुहास बावचे, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकीकर आणि त्यांच्या पथकाने कमला कोर्ट बिल्डींगमधील देशपांडे यांच्या शनिवार पेठेतील पर्वती माता सोसायटीतील शॉप नंबर 1 आणि बुधवार पेठेतील देशपांडे व्हेंडरच्या दुकानावर छापा टाकला. तेथून 100 आणि 500 रुपये किंमतीची 68 लाख 38 हजार 170 रूपयांचे स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले. देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने आपआपसात संगनमत करून कुठलाही अधिकार नसताना वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार असा शिक्‍का तयार केला होता.

कोषागार कार्यालयातून स्टॅम्प पेपर बाहेर काढताना हा शिक्‍का मारला जातो. देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून स्टॅम्प पेपरची विक्री केली. आरोपींनी इतक्‍या मोठ्या रक्‍कमेचे स्टॅम्प पेपर कोठून आणले याबाबत तपास सुरू आहे. उपरोक्‍त तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांची 21 जूनपर्यत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

चिन्मय देशपांडे यांचा आजोबांपासून स्टॅम्प विक्रीचा व्यवसाय आहे. मागील 40 वर्षे ते स्टॅम्प विक्री करत आहेत. सध्या त्यांच्या आईच्या नावावर स्टॅम्प विक्रीचा परवाना आहे. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरुन कोरे स्टॅम्प मिळवले होते. त्यावर कोषागार अधिकाऱ्याची सही व शिक्का स्वत: मारला होता. त्यांच्याकडे काही 2017 व 2018 चे स्टॅम्पही सापडले आहेत.
– सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग.

तेलगी प्रकरणाची आठवण
पुण्यातील या स्टॅम्प पेपर प्रकरणानंतर तेलगी मुद्रांक घोटाळ्याची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. त्या प्रकरणानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट स्टॅम्प सापडल्याचे बोलले जात असून यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×