पुणे : न्याय आपल्या दारी या संकल्पनेचा प्रत्यय शनिवारी (दि.२२) शिवाजीनगर न्यायालयात आला. न्याय मिळविण्यासाठी एरवी पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. मात्र, अपघातात मणक्याचे दिव्यांगत्व आलेल्या शेतमजूर महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयच दोन मजले उतरून खाली आले. तिचे म्हणणे ऐकून घेत तिला न्यायही दिला. तिला १५ लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. अन् त्या महिला पक्षकाराचा चेहरा आनंदला. राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयाची एक वेगळी बाजू पक्षकारांना पहायला मिळाली.
सुनिता अनिल गायकवाड असे दिव्यांग महिलेचे नाव आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये शहरातील माई मंगेशकर रुग्णालय परिसरात रस्ता ओलांडत असताना सुनिता यांना चारचाकीची धडक बसली. यामध्ये, त्यांना ४२ टक्के अपंगत्व आले. याप्रकरणात, नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी अॅड. स्मिता पाडोळे यांच्यामार्फत त्यांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दावा दाखल केला. राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर आणि अॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनल पुढे हा दावा तडजोडीसाठी ठेवला होता.
राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होण्यासाठी सुनिता या रिक्षामधून शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील नवीन इमारतीसमोर हजर झाल्या. यावेळी, मणक्याच्या दिव्यांगतेमुळे दुसर्या मजल्यावर जाणे त्यांना नेणे शक्य नव्हते.
त्यामुळे, त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर आणि पॅनेल न्यायाधीश अॅड. अतुल गुंजाळ दुसर्या मजल्यावरून खाली उतरून रिक्षा थांबलेल्या ठिकाणी आले. अॅड. स्मिता पाडोळे यांच्यामार्फत सुनिता यांनी म्हणणे पॅनेल पुढे मांडले. सत्र न्यायाधीश क्षीरसागर यांनी आस्थेने चौकशी करीत न्यायालयीन प्रक्रिया मार्गी लावली. अॅड. पाडोळे यांना अॅड. शितल शिंदे व अॅड. स्नेहा भोसले यांनी सहकार्य केले.