पुणे – शिवाजीनगर मतदारसंघावर दावा कोणाचा शिवसेना का भाजपा?

पुणे – शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा हा विधानसभा मतदार संघ आता भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपने दमदार कामगिरी केली. त्यामुळे विजय काळे हे निवडून आले. त्यानंतर पालिका निवडणुकांमध्ये 12 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे या मतदार संघात भाजपची ताकद चांगली वाढली आहे. त्याचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना झालेला दिसतो. बापट यांना या मतदारसंघातून 29 हजार 532 मताधिक्‍य मिळाले आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपला 40 हजाराचे मताधिक्‍य मिळाले होते. त्या मानाने हे मताधिक्‍य कमी असले, तरी हा मतदारसंघ पारंपारिकरित्या भाजपचा नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. त्या जोरावर हे मताधिक्‍य मिळाले होते.

शिवाजीनगर मतदारसंघ तसा पूर्वी शिवसेनेचा, त्यानंतर कॉंग्रेसचा राहिला आहे. भाजपची याठिकाणी ताकद अत्यंत कमीच होती.या मतदारसंघातील मॉडेल कॉलनीवगळता भाजपचे नगरसेवक निवडून येत नव्हते. खडकी कॅन्टोन्मेंट सुद्धा कॉंग्रेसच्या ताब्यात आहे.त्यामुळे याठिकाणी भाजपने आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्यात गेल्या पाच वर्षांत यश मिळविले आहे. त्याचा फायदा यंदा भाजपला झाला आहे. कॉंग्रेसचे अस्तित्व खडकी कॅन्टामेंट बोर्डापुरते मर्यादित राहिले आहे, पण तेथेही फार काही फायदा कॉंग्रेसला झालेला नाही. राष्ट्रवादीचे काही भागात चांगले वर्चस्व आहे, पण तेथेही भाजपलाच आघाडी मिळाली आहे. वंचित आघाडीने या मतदार संघातून तब्बल 11 हजार 376 मते मिळविली आहेत.

या मतदार संघातून गिरीश बापट यांना 77 हजार 982, तर कॉंग्रेसचे मोहन जोशी यांना 48 हजार 450 मते मिळाली आहेत. युतीचा धर्म पाळला, तर हा मतदार संघ शिवसेनेकडे जातो. पण, याठिकाणी आता शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. त्यांचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ नक्की कोणाला जाणार, याबाबत आता उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.