पुणे – वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने याठिकाणी नविन कामगार भवन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील पुणे विभाग अप्पर कामगार आयुक्त व पुणे जिल्हा कामगार उपायुक्त ही दोन्ही कार्यालयांचे स्थलांतर संगमवाडी येथील शक्ती चेंबर्स या इमारतीमध्ये करण्यात आले आहे.
वाकडेवाडी येथील जागेत कामगार आयुक्त कार्यालय आहे. सध्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाची इमारत जुनी झाली असून मोडकळीस आली आहे. इमारत जुनी असल्याने तसेच जागा अपुरी असल्याने याठिकाणी अधिकारी-कर्मचारी यांना बसण्याची गैरसोय होते. तसेच, कामगार येथे न्याय मागण्यासाठी येतात.
या कार्यालयात पुणे जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातूनही कामगार, कामगार संघटना, नागरिक, कंपन्यांचे अधिकारी येत असतात. त्यामुळे या कार्यालयात मोठी गर्दी असते. कार्यालयात अपुरी जागा असल्याचे उभे राहण्यास सुद्धा जागा नसते. या पार्श्वभूमीवर या जागेत नवे कामगार भवन उभारण्यात येणार आहे. कामगार भवन उभारण्यासाठी जुनी इमारत पाडणे आवश्यक असल्याने येथील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे, त्यानुसार संगमवाडी येथील सर्व्हे नंबर 77 येथील शक्ती चेंबर्स येथील दुसरा, तिसरा आणि चौथ्या मजल्यावर हे कार्यालय असणार आहे.