पुणे : शहरात 12 ते 18 वयोगटांतील सात ते आठ लाख लाभार्थी

पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणात 12 ते 18 वयोगटातील बालकांना पुढील महिन्यापासून लस दिली जाणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. पुण्यात या वयोगटातील सुमारे सात-आठ लाख बालके लाभार्थी ठरणार आहेत. परंतु, याचेही टप्पे ठरवले जाणार आहेत.

तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्‍वभूमीवर बालकांचे हे लसीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
“कॅडिला हेल्थकेअर’तर्फे पुढील महिन्यात 12 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी “झायकोव्हडी’ ही लस लॉंच केली जाणार आहे. औषध नियामक संचालकांनी गेल्या महिन्यातच या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

“भारत बायोटेक’ने मुलांसाठीच्या कोवॅक्‍सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. याशिवाय “सीरम इन्स्टिट्यूट’ने दोन ते 12 वर्षे वयोगटांतील मुलांसाठी “कोव्हाव्हॅक्‍स’ची चाचणी करत असून, सध्या त्यांची दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीतील प्रक्रिया सुरू आहे.

बालकांच्या लसीकरणाला सुरुवात करताना प्रौढांप्रमाणेच “सिस्टिम’ केली जाणार आहे. सुरुवातीला जन्मत: कोमॉर्बिड असलेले म्हणजे हृदयविकार, कॅन्सर, मेंदूविकार, किडनीचे आजार आदी असलेल्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य बालकांचे लसीकरण होईल.

पुण्यामध्ये सद्य:स्थितीतील लोकसंख्येनुसार शून्य ते 18 वयोगटातील सुमारे 13 लाख बालके आहेत. त्यातील 12 ते 18 वयोगटातील अंदाजे सात ते आठ लाख बालके आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.