पुणे – शहरात सातशे मिळकती सील

मिळकतकराचे 35 टक्‍के उत्पन्न ऑनलाइन पद्धतीने जमा


 

46 टक्‍के करदात्यांकडून ऑनलाइन भरणा

पुणे – महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसुली मोहीम जोरात सुरू केली असून, सातशे मिळकतींना सील ठोकण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे ऑनलाइन बिल भरणाऱ्यांची संख्या वाढून ती 35 टक्‍के झाली आहे.

महापालिका हद्दीतील करदात्यांना घरबसल्या मिळकतकर भरता यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेला करदात्या पुणेकरांनी चांगलीच पसंती दिली आहे. महापालिकेकडे जमा झालेल्या मिळकतकरापैकी 34.96 टक्‍के रक्‍कम ही ऑनलाइन पद्धतीने जमा झाली आहे. तर मिळकतकर भरलेल्या एकूण करदात्यांपैकी 45.87 टक्‍के करदात्यांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला आहे. दरम्यान, आजपर्यंत 1 हजार 95 कोटी रुपये मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याचे कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले आहे.

मागील काही वर्षांपासून मिळकत धारकांकडून वेळेत कर भरला जात नसल्याने पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शहरातील अधिकाधिक नागरिकांनी मिळकतकर भरावा, यासाठी पालिकेच्या वतीने प्रोत्साहन म्हणून मिळकत करात सवलत दिली जाते. तर जे मिळकतधारक मुदतीत कर भरत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
करदात्यांना घरबसल्या कर भरता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने ऑनलाइन कर स्विकारण्यासाठी भारत क्‍युआर कार्ड, कॅश कार्ड, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, ईबीपीपी, मोबाइल वॉलेट, एनईएफटी आरटीजीएस, नेट बॅंकींग, पोस्ट क्रेडीट कार्ड, पोस्ट डेबीट कार्ड, युपीआय, गुगल पे, फोन पे आदी प्रणालींचा अवलंब केला आहे. या प्रणालींना करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

महापालिकेकडे जमा झालेल्या 1 हजार 95 कोटी मिळकतकरापैकी 381 कोटी 58 लाख 60 हजार 386 रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा झाले आहेत. ही रक्‍कम एकूण मिळकतकराच्या 34.96 टक्‍के एवढी आहे. तर मिळकतकर भरलेल्या एकूण करदात्यांपैकी 45.87 टक्‍के करदात्यांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला आहे. यामध्ये नेट बॅंकींगद्वारे कर भरणाऱ्यांची संख्या 1 लाख 46 हजार 220 आहे. तसेच क्रेडीट कार्डच्या माध्यमातून 92 हजार 951 आणि डेबीट कार्डच्या माध्यमातून 83 हजार 927 करदात्यांनी कर जमा केला आहे.

सातशे मिळकती सील
महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाईच्या विविध मोहिमा हाती घेतल्या जातात. यामध्ये थकबाकी दारांच्या घरांसमोर बॅंड वाजविणे, नोटीसा देणे, थकबाकीदारांची नावे चौकात फ्लेक्‍सवर लावणे, मिळकती सील करणे, मिळकतीचा लिलाव करणे, आदींचा समावेश आहे. सन 2018-19 या वर्षामध्ये पालिका प्रशासनाने शहरातील सुमारे 700 मिळकती सील केल्या आहेत. दरम्यान, आजवर 1 हजार 95 कोटी मिळकतकर जमा झाला असून आणखी पंधरा दिवसांत 100 ते 150 कोटी मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल, अशी माहिती कर आकारणी-कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)