पुणे -“सीरम’ने उभारला ऑक्‍सिजन प्रकल्प

शहरातील रुणालयांना मोफत ऑक्‍सिजन पुरवणार

पुणे – “सीरम इन्स्टिट्यूट’ने स्वखर्चाने ऑक्‍सिजन प्लांट उभारला असून 200 रुग्णांना पुरेल एवढी ऑक्‍सिजन निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे. हा ऑक्‍सिजन रुग्णालयांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी सांगितले. प्रायमूव्ह इंजिनीअरिंग प्रा. लि. या कंपनीने युद्धपातळीवर म्हणजे 12 दिवसात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कॉम्प्रेसरसारख्या गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आणण्यापासून कस्टम क्‍लिअरन्स, एफडीए परवानगी, पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्थांच्या परवानग्या, प्रत्यक्ष प्रकल्पाची उभारणी या गोष्टी फक्‍त 12 दिवसांत पूर्ण करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला पूनावाला यांनी लगेच प्रतिसाद देऊन ऑक्‍सिजन सिलिंडर विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

“सीरम इन्स्टिट्यूट’ला त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये ऑक्‍सिजनचा वापर अनेकदा करावा लागतो, त्यासाठी त्यांची स्वतःची ऑक्‍सिजन केंद्रे आहेत. वैद्यकीय ऑक्‍सिजनच्या पुरवठ्यासाठी या ऑक्‍सिजन प्रकल्पाचा वापर करता येईल, हे लक्षात आल्याने “सिरम’ने हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशा प्रकारच्या उच्च दाबाच्या सिलेंडर भरण्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा कशा तयार कराव्यात आणि सर्व परवानग्या आणि मंजुरी देऊन कमीतकमी काळात ही यंत्रणा कार्यान्वित कशी करायची ही समस्या होती. ही जबाबदारी “प्रायमूव्ह’ ला देण्यात आली आहे.

अशी आहे क्षमता…
सीरम इन्स्टिट्युटने उभारलेल्या प्रकल्पातून दिवसाला 200 रुग्णांना उपयोगी पडेल एवढी ऑक्‍सिजन निर्मिती होते. “आयएसआय’ कोड आणि “एफडीए’ मानकांनुसार आवश्‍यक वैशिष्ट्यांसह 93% पेक्षा जास्त शुद्धतेचा ऑक्‍सिजन 150 बारच्या दाबाने सिलिंडर्समध्ये भरला जातो. एका सिलिंडरमध्ये 7,000 लिटर ऑक्‍सिजनची क्षमता असते.

============

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.