पुणे – ज्येष्ठ नेत्याचा स्वपक्षीयांविरोधातच “लेटरबॉम्ब’

कॉंग्रेसमध्ये एकजूट राहिली नसल्याचा दावा : उल्हास पवार यांचे राहुल गांधी यांना पत्र

पुणे – राज्यातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती अतिशय वाईट आहे. केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांना दाखवण्यासाठी केवळ एकजूट दाखवली जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. लोकसभा निवडणुका समोर असताना केवळ एकत्र असल्याचे भासवले जात असल्याचे पत्र माजी आमदार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी थेट कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिले आहे. या “लेटरबॉम्ब’मुळे पक्षात खळबळ उडाली असून, नेत्यांमधील नाराजी आता उघड होऊ लागली आहे.

काही दिवसांपूर्वी असेच पत्र माजी आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी दिले होते. इच्छुकांची यादी चर्चा न करता परस्पर फायनल करून पाठवली गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्‍त केली होती. त्यांनीही राहुल गांधी यांना पत्र लिहून कळवण्याचा इशारा दिला होता. आता दुसऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत “लेटरबॉम्ब’ दिला आहे.

पुण्यातील कॉंग्रेसच्या कारभारावर पवार यांनी आक्षेप घेतला आहे. पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मागे ज्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांच्यामुळे कॉंग्रेस दुबळी झाली आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पवार यांनी केली आहे. पुण्यातील उमेदवारीसाठी आपण कसे योग्य आहोत हे या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. पवार यांनी राज्यात नेमण्यात आलेल्या प्रभारी नेतृत्त्वावरही आक्षेप घेतला आहे. यामुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असून राज्यातील कॉंग्रेसमध्ये एकजूट दिसत नाही. नेते मंडळींमध्ये एकवाक्‍यता नसल्याचेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

अन्य एका नावाचीही चर्चा
पुण्यातून लोकसभेसाठी तीन नावे पक्ष नेतृत्त्वाला कळवण्यात आली आहेत. यामध्ये मोहन जोशी, अभय छाजेड आणि अरविंद शिंदे या नावांचा समावेश आहे. सध्या पुण्यात या तीन नावांव्यतिरिक्त अन्य एका नावाची चर्चा सुरू आहे. प्रदेश कॉंग्रेसकडून या नावाची शिफारस करण्यात येत असून हे मोठे षड्‌यंत्र असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पवार हे कॉंग्रेसच्या प्रदेश आणि शहरातील नेतृत्त्वावर नाराज असल्याचे या पत्रातून दिसून येत आहे. पुण्यातील कॉंग्रेसला वैभव प्राप्त करून द्यायचे असल्यास आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

एकनिष्ठ राहूनही अपमान
पुणे शहर कॉंग्रेसकडून इच्छुकांच्या यादीमध्ये पवार यांचे नावही टाकण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे पवार यांनी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्याबरोबर काम केले आहे. राज्याच्या युवक कॉंग्रेसची धुरा त्यांनी सांभाळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेसचे एकनिष्ठ राहून त्यांनी काम केले आहे. ज्येष्ठ असूनही, असा अपमान करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)