हेचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ।।
न लगे मुक्ति धन संपदा । संत संग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावें आम्हांसी ।।
देहुगाव – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा अर्थात तुकाराम बीज रविवारी होत आहे. येणाऱ्या वारकरी, भाविकांच्या सुविधांसाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवक, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, शासकीय यंत्रणेसह प्रशासन सज्ज झाले आहे.
अखंड पारायण, हरिनाम सप्ताह ,भजन-कीर्तन आणि आगमन होणाऱ्या दिंड्या व भाविकांमुळे परिसरात भक्तीमय वातावरण आहे. पदेहूत प्रवेश करणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स उभारण्यात आले असून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसेच पोलिसांनी नाकाबंदी देखील केली आहे. रविवारी दिवसभर देहूरोडहून देहूकडे, आळंदी मार्गे तळवडे देहूकडे, चाकण-तळेगाव महामार्गावरील देहूफाटा मार्गावरुन देहूकडे यणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
चाकण तळेगाव मार्गे मुंबई पुणे महामार्ग आणि कासारवाडी चाकण नाशिक महामार्ग मार्गे वाहने वळविण्यात आले देहुगाव च्या अंतर्गत रस्त्याच्या दुर्तफा उभ्या वाहनांवर, दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी आपली वाहने रस्त्यावंर उभी करू नयेत.
सोहळा सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील आणि वाहतूक नियंत्रक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले आहे.
आज विविध धार्मिक कार्यक्रम
पहाटे 3 वा. श्रीच्या मंदिरात काकडा आरती, पहाटे 4 वा. श्री संत तुकाराम शीळा मंदिर,श्री विठ्ठल-रखुमाई, पालखी सोहळ्याचे जनक, तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज, वारकरी यांच्या हस्ते, पहाटे 6 वा. वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) श्री संत तुकाराम महाराज महापूजा सकाळी 10.30 पालखी प्रस्थान मुख्य मंदिरातून वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा ) संत तुकाराम महाराज मंदिराकडे, सकाळी 10 ते 12 हभप देहूकर महाराज यांचे वैकुंठगमन सोहळा कीर्तन, दुपारी 12.30 पालखीचे मुख्य
मंदिराकडे पुनरागमन
मास्कचा वापर अनिवार्य
करोना संकट अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेले नसल्याने भाविकांनी सुरक्षिततेची दक्षता घेण्यासाठी करोनाचा नियमांचे पालन करावे, मास्क वापर करावा, सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) राखण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी संजय असवले, तहसीलदार गीता गायकवाड, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव आदींनी केले आहे.