पुणे – शहरातील विविध शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात. अनोळखी व्यक्तीला शाळा, महाविद्यालय आवारात प्रवेश देऊ नये, अशा सूचना पुणे पोलिसांनी शाळा प्रशासनाला दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील मध्य भागातील शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक पोलीस आयुक्तालयात आयोजित केली होती.
यावेळी परिमंडळ- 1 च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुनील माने, फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आदी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नियमावली सादर करण्यात आली.
शाळा, महाविद्यालयांसाठी सूचना
संस्थेच्या आवारात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही बसवावेत.
कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण वर्षभर
साठविण्याची सुविधा असावी.
संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारात नोंदणी पुस्तिका ठेवावी.
बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकाची नोंद करून त्याला संस्थेच्या आवारात प्रवेश देण्यात यावा.
शाळा भरणे, सुटण्याच्या वेळेत संस्थेतील कर्मचारी, शिक्षक, सेवकवर्गाने प्रवेशद्वारावर उपस्थित रहावे.
संस्थेच्या आवारात शक्यतो सेवानिवृत्त सैनिकांना सुरक्षारक्षक म्हणून नेमावी.
सुरक्षारक्षक नेमताना त्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे आहे.
विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनचालकांचा परवाना, आधारकार्ड, चारित्र्य पडताळणीची प्रत जमा करावी. ,
जे विद्यार्थी पालकांबरोबर जातात, त्यांचे पालक शाळेत येईपर्यंत विद्यार्थ्यांबरोबर शाळेतील सेवकवर्गाने थांबणे गरजेचे आहे. शाळेतील प्रसाधनगृहाच्या परिसरात कॅमेरे बसवावेत.