पुणे –करोना प्रतिबंधात्मक उपाय-योजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याला प्राधान्य देत शहरातील विविध भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्यात संमिश्र प्रतिसाद आढळून आला आहे. विद्यार्थ्यांमुळे शाळा परिसर चांगलाच फुलला होता. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरल्याचे दिसून आले.
करोनामुळे विद्यार्थी घरी बसूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते. प्रत्यक्षात शाळा सुरू कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. शाळांनी आपआपल्या पद्धतीने नियोजन करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. “करोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून दररोज शाळा भरविण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता शाळेत यावे,’ अशा सूचनाही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात आले होते. सोशल डिस्टंन्सिंगेच पालन करण्यालाही अधिक महत्त्व देण्यात आले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलकही लावण्यात आले होते.
स्कूलबसचा वापर करण्याएवेजी पहिल्या दिवशी पालकांनी मुलांना शाळेत सोडण्याला प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणी, शिक्षक, कर्मचारी यांना भेटण्याचा व त्यांच्या गप्प्या मारण्याचाही आनंद घेतला. विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण परिसर, वर्ग, ग्रंथालय, मैदान बऱ्याच महिन्यांनी गजबजलेला पहायला मिळाला.