नवे शैक्षणिक वर्ष : यंदाही शिक्षण ऑनलाइन
पुणे – नव्या शैक्षणिक वर्षाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. करोनामुळे यंदाही शाळांची घंटा ऑनलाइनच वाजणार आहे. यासाठी शाळांनीही जोरदार तयारी केली आहे.
लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी या निर्बंधामुळे व विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करून शाळा बंदच होत्या. त्यामुळे पहिली ते बारावीच्या परीक्षाही रद्द करून सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णयही झाला. मागील वर्षी सततच्या ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी नंतर कंटाळले होते. त्या आता पुन्हा ऑनलाइन शिक्षणानेच शाळा सुरू होत आहेत.
दरम्यान, शाळांनी स्वच्छतेबाबतची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देत शिक्षकांच्या ऑनलाइन, ऑफलाइन बैठका घेतल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी, पालकांच्या ऑनलाइन बैठका घेऊन विविध सूचना देण्यात आलेल्या आहेत. मोबाइल, लॅपटॉप, संगणक आदी साहित्य खरेदी व दुरुस्तीसाठी पालकांची धांदल उडू लागली आहे. प्रवेशोत्सव यंदाही प्रत्यक्षात साजरा होणार नसल्याने विद्यार्थी हिरमुसले आहेत.
करोनाची स्थिती पाहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार शाळा ऑनलाइन, ऑफलाइन सुरू करण्यात येणार आहे. त्यातही प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षणालाच प्राधान्य देण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांमधील शिक्षकांची 50 टक्के, तर इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांमधील शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येणार असून, शाळांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.
– दत्तात्रय जगताप, शिक्षण संचालक