पुणे – पुणे, रायगड आणि मुंबईमधील काही खासगी शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या असून, शासनाला असलेल्या अधिकारांचा योग्य तो वापर करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, पुण्यातील खासगी शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात शाळा संचालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दिल्या.
पुणे येथे एका खासगी शाळेने शुल्क भरण्यावरून पालकांना बाउन्सरच्या माध्यमातून मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिरीष फडतरे, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पुणे पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे, अभिजित पोलेकर उपस्थित होते.
खासगी शाळांमध्ये बाउन्सर नेमण्याची वेळ का येते याबाबत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अशाप्रकारच्या गैरवर्तन करणाऱ्या राज्यातील शहरी भागातील अनेक शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या असून त्यांचा आढावा घेण्यात येत आहे. राज्यातील सर्व खासगी शाळांनी पालक आणि विद्यार्थी यांना अतिशय सामंजस्याने वागविण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला शुल्का अभावी शाळेतून घरी ठेवू नये अथवा त्यासाठी पालकांना नाहक त्रास देऊ नये याकरिता शालेय शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. शाळांबाबत तक्रार निवारण समित्या, तक्रार निवारण अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असून, अशा स्वरूपाचे काही प्रकार घडल्यास स्थानिक पातळीवर सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गंभीर स्वरुपाच्या तक्रारीबाबत अधिकारी वर्गाने स्वत: पाहणी करून याबाबत कार्यवाही करावी. काही निवडक शाळांबाबत आलेल्या तक्रारीबाबत आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण संचालकांना दिले आहे.
महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवालावरून पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी. संबंधित बाउन्सर पुरवठा करणारी खासगी संस्था आणि शाळा प्रशासन यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. शाळा प्रशासनाने पालकांना शाळेत भेटण्याच्या वेळा निश्चित करून, संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्रमांक शाळेच्या दर्शनी भागात लावावे.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती