पुणे -शहरातील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे मृतदेहाची ने-आण करण्यासाठी शववाहिका कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओच्या सहकार्यातून पुणे महापालिकेस 10 स्कुल बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्कुलबसमध्ये आवश्यक ते बदल करून त्या “शववाहिका’ म्हणून वापरण्यात येतील. स्कुलबसमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
यासाठी स्कुल बस म्हणून वापरल्या जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर, मोठया बसमधील पॅसेंजर सीट काढून त्याचा वापर शववाहिका म्हणून करता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अशा बसेसची मागणी केली होती.
त्यानुसार आरटीओ प्रशासनाने महापालिकेस 10 बसेस भाडेतत्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत.
या वाहनाचे भाडे, चालक भत्ते व मानधन महापालिका देणार आहे. या बसेसना मोटार वाहन कायदा 1968 चे कमल 6(3) नुसार रुग्णवाहीका व शववाहिका म्हणून वापरल्या जाणाऱ्या परिवहन परवान्यापासून सुट देण्यात आली आहे. बुधवारपासून शहरात या वाहनांव्दारे सेवा देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे एकनाथ ढोले यांनी सहकार्य केले.
करोना काळात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महापालिका प्रशासनास आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे