पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विधी विभागात प्राध्यापकांची 5 पदे भरणार

पुणे विद्यापीठ प्रशासनाला अखेर शहाणपण
बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिल्या होत्या विभाग बंद करण्याच्या सूचना

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विभागात प्राध्यापकांची पदे रिक्‍त असल्याने हा विभाग बंद करण्याच्या सूचना काही महिन्यांपूर्वी बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर विधी विभागात रिक्‍त असलेली पाच प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय विद्यापीठात शनिवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

विधी शाखेची शिखर संस्था असलेली बार कौन्सिल ऑफ इंडियाने विधी विभागातील प्राध्यापकांची रिक्‍त पदे भरा अन्यथा विभाग बंद करा, अशा स्पष्ट सूचना देशातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालांना केल्या होत्या.

राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीस मान्यता नसल्याने विद्यापीठातील विधी विभागात प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे हा विभाग कसा सुरू ठेवायचा असा प्रश्‍न विद्यापीठापुढे निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने पुढाकार घेत विद्यापीठ फंडातून पाच पदे भरण्यास मान्यता दिली.

दरम्यान, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची शनिवारी बैठक झाली. विधी विभागात रिक्‍त पदावर चर्चा होत अंतिम निर्णय घेण्यात आला.

उर्वरित 210 पदे रिक्‍तच
विद्यापीठात एकूण 57 विभाग असून एकूण 386 पदे मंजूर आहेत. त्यातील सध्या केवळ 176 पदे भरलेली असून 210 पदे रिक्त आहेत. प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीनंतर पदे भरलीच गेली नाहीत. त्यामुळे विद्यापीठ फंडातून रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत विद्यापीठ फंडातून 117 प्राध्यापकांची नियमित, तर 86 पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात आली, अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.

पुणे विद्यापीठातील विधी विभागात प्राध्यापक नसल्यामुळे विभाग कसा चालवावा, असा प्रश्‍न आहे. बार कौन्सिलने सुद्धा प्राध्यापक नसतील तर विभाग बंद केला जाणार असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने विधी विभागात प्राध्यापकांची पाच पदे भरण्यास मान्यता दिली.
राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.