पुणे-सातारा महामार्गाची समस्या सुटणार तरी कधी?

वाहनचालक आणि महामार्ग प्राधिकरणात "तू-तू-मैं-मैं'

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर 1 एप्रिलपासून पुन्हा एकदा टोल वाढवण्यात आल्याने वाहनचालकांत नाराजी आहे. त्याविषयी विविध वाहनचालकांनी नोंदवलेले आक्षेप आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यात सतत वाद सुरु असतो. कधी हा मार्ग निर्धोक होणार आहे, असे प्रश्‍न वाहनचालक सतत विचारत असतात.

या रस्त्यावर टोलच्या रांगांसकट अनेक अडथळे पार करताना संयम सुटत जातो. आणि मग घुसाघुशी सुरू होते. नियम पाळावेसे वाटले पाहिजेत असे नियम आणि सुटसुटीतपणा असावा. आपणच म्हणतो राजकारण्यांचा दबाव असतो, मग तक्रार करण्याचा उत्साह राहील का? साऱ्या जगण्यावर मरगळ येईल असे वातावरण आहे.

देशातल्या प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर स्पीडगनची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये वावगे काहीही नाही वेगमर्यादेचे उल्लंघन करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे त्यामुळे स्पीडगन विषयी आक्षेप नोंदवणे चूक आहे, असे म्हटले जाते. तसेच पुणे-सातारा रस्त्यावर एका डायव्हर्जनच्या इथे सर्विस रोडला स्पीड ब्रेकर आहे. महामार्गावर टोल नाक्‍या व्यतिरिक्त कोठेही स्पीडब्रेकर नाही.

या रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन होण्याइतका वेग घेता येतो असे वाटणे हेच विनोदी वाटल्याचे प्रवासी सांगतात. सामान्य नागरिकांना सतत गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, आक्षेप न ऐकून घेणे, स्वतःची जबाबदारी पार न पाडता आक्षेप नोंदवणाऱ्या नागरिकांना बंधने घालणे हे आता अंगवळणी पडले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कोणत्याही तक्रारीसाठी 1033 ही हेल्पलाइन 24 तास सुरू असते आपण नोंदवलेली तक्रार निवारण होईपर्यंत ही तक्रार बंद केली जात नाही, असेही सांगतात. मात्र कोणीही प्रवासी किंवा हायवेचा वापर करणारे या सुविधेचा लाभ घेत नाहीत, हे वास्तव आहे.

पुणे-सातारा या मार्गावरील धांगवडी येथील उड्डाण पुलाचे काम सुरू झालेले दिसते. शेजारीच पांडव कालीन मंदिर आहे त्यामुळे येथे पांडव कालीन पुलाचे अवशेष असावेत असा एक समज होता. या महामार्गाचे काम एक ऐतिहासिक वास्तू किंवा काम म्हणावे लागू नये अशी आशा स्थानिकांकडून केली जात आहे.

सध्या साताऱ्याहून पुण्याला येताना शिरवळ ओलांडल्यावर परंतु नदी ओलांडण्यापूर्वी शिंदेवाडी फाटा लागतो तेथे रोज ट्रॅफिक जॅम अर्थात वाहतूक मुरंबा होऊ लागला आहे. म्हणजे आता लवकरच तिथे उड्डाणपूल होणार. म्हणजे अजून एक बाह्य वळण. म्हणजे अजून खड्डे, म्हणजे प्रवासाचा वेळ वाढणार, म्हणजे पुन्हा आंदोलन, म्हणजे पुन्हा निविदा, म्हणजे अजून वेळ, म्हणजे पुन्हा निविदा वाढवून, कालपव्यय होणार, अशी भीतीही नागरिकांना वाटते आहे. धांगवाडी उड्डाणपूल अजून सुरू होतोय, नसरापूर अधूनमधून बंद असतो, शिरवळ तीच गत. खड्ड्यांची तर किलोमीटर प्रमाणे नोंदी देऊ शकतील, असे नित्य प्रवास करणारे नागरिक सांगतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे ही फक्त खेड शिवापूर ते सारोळा पूल या दरम्यानची आहेत या प्रलंबित कामांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार नसून स्थानिक नागरिकांनी केलेला विरोध फुलांमधील बदल आणि अनेक अवास्तव मागण्या यामुळे ही कामे प्रलंबित राहिली आहेत, असे महामार्ग प्राधिकरण सातत्याने सांगते. राजकीय नेत्यांच्या नादाला लागून स्थानिक नागरिकांनी धांगवडी नसरापूर आणि किकवी येथील कामे बंद पाडली होती, हे वास्तव तपासून पहाणेही गरजेचे आहे.

खंबाटकीची पहिली काही वळणे संपल्यावर मुख्य घाट सुरू होतो त्यापूर्वी जोशी वडेवाले यांच्या हॉटेलपूर्वी एक कालवा लागतो त्यावरील पूल दोन पदरी आहे तिथे काहीही सूचना नाही. घाटात एक मंदिर आहे त्यापूर्वीचा अर्धा किलोमीटर रस्ता खराबही आहे आणि अरुंदही आहे. घाट उतरताना शेवटच्या दोन वळणे आधी उजव्या मार्गिकेत अनेक दिवस एक खड्डा होता आता त्यावर डांबर थापून उंचवटा करण्यात आलेला आहे. पुढे सुरूर फाट्यावरील उड्डाणपुलावर खड्डे आहेत किंबहुना त्यापुढील प्रत्येक उड्डाणपुलावर खड्डे आहेत. भुईंज येण्याआधीच्या कलव्हर्टवर खूपच खड्डे आहेत इथे स्पीड 40 पर्यंत खाली आणावा लागतो. विरंगुळा ढाब्यापाशी कृष्णा नदीवरील पूल आणि त्यापुढील रस्ता खड्डेमय आहे.

खंबाटकी घाटातील मंदिराजवळचा रस्ता रुंदीकरण झालेला नाही. त्या ठिकाणी डोंगर फोडल्यास मंदिराजवळचे तळे नाहीसे होण्याची शक्‍यता आहे. शिवाय देवस्थानची जागा असल्यामुळे त्या सर्व लोकांनी विरोध केलेला आहे म्हणून हे काम प्रलंबित आहे, असे समजते.

या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी खंबाटकी घाटा मधून एक नवा सहापदरी बोगदा बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा बोगदा खंबाटकीच्या विद्यमान बोगद्याच्या अलीकडून डावीकडच्या रस्त्याने म्हणजे आराम हॉटेल जवळच्या शिवाजी पुतळ्यापासून निघणार असून तो बेंगरूटवाडीच्या एस वळणाच्या पलीकडे उतरणार आहे त्यामुळे जाता-येता ची दोन्ही वाहतूक या नव्या सहा पदरी बोगद्यातून होणार आहे त्याचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे वाहतून सुरळीत होण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.