टोलच्या रकमेत 5 रुपये ते 35 रुपयांनी वाढ : आजपासून होणार अंमलबजावणी
पुणे – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावर आकारण्यात येणाऱ्या टोलच्या रक्कमेत वाढ होणार असून उद्यापासून (दि.1) ही दरवाढ लागू होणार आहे. या टोलच्या रकमेमध्ये 5 रुपये ते 35 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार आहे.
केंद्र सरकार महागाईच्या निर्देशंकानुसार प्रत्येक वर्षी राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये कमी अधिक प्रमाणात वाढ करण्यात येते. नव्याने लागू करण्यात येणारी दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होत असते. या वर्षी देखील टोलचे दर वाढवण्यात आले आहेत. पुणे -सातारा महामार्गावर दोन टोल नाके आहेत. या महामार्गावरील आणेवाडी आणि खेड-शिवापूरचा टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो.
खेड-शिवापूर टोलनाक्यावर हलक्या मोटारींना यापूर्वी एकेरी प्रवासासाठी 90 रुपये आणि दुहेरी प्रवासाठी 135 रुपये तर, आणेवाडी येथे एकेरीसाठी 60 रुपये आणि दुहेरीसाठी 95 रुपये टोल आकारला जात होता. आता नव्या दरानुसार खेड शिवापूर टोल नाक्यावर एकेरी प्रवासाठी हलक्या वाहनांना 95 रुपये तर दुहेरी प्रवासासाठी 140 रुपये द्यावे लागणार आहे. तसेच आणेवाडी टोलनाक्यावर एकेरी प्रवासासाठी 65 रुपये तर दुहेरी प्रवासासाठी 95 रुपये द्यावे लागणार आहे.