पुणे – राज्यातील आयुर्वेद महाविद्यालये आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या रुग्णालयांत परिचारिकांची पदे बाह्य स्रोतांमार्फत भरण्याला परिचारिकांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या मागण्यांसाठी “महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने’ राज्यस्तरीय दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शुक्रवारी या संपाचा दुसरा दिवस होता. मागण्या मान्य न झाल्यास शनिवारपासून (28 मे) बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
या संपात ससून सर्वोपचार रुग्णालयातील सुमारे 600 परिचारिका सहभागी झाल्या आहेत. एकूण संख्येपैकी 80 ते 90 टक्के परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती संघटनेच्या पुणे अध्यक्ष आरिफा शेख यांनी दिला आहे.
रुग्ण-नातेवाईकांचे हाल
परिचारिका संपावर असल्याने रुग्णांचे हाल झाले. तातडीचे दाखल रुग्ण वगळता इतर रुग्णांची सेवा ठप्प आहे. याबाबत डॉक्टरांना अतिरिक्त ड्युटीज लावण्यात आल्या आहेत. तसेच यामुळे नवीन रुग्ण दाखल करण्याचेही प्रमाण कमी झाले असून, ऑपरेशन थिएटरमध्ये परिचारिकांच्या स्वरुपात मदतनीसच उपलब्ध न झाल्याने तातडीचे वगळता नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
या आहेत मागण्या…
परिचारिका संवर्गातील सर्व स्तरातील 100 टक्के पदोन्नती, पदनिर्मिती आणि पदभरती बाह्य्रस्रोतांद्वारे न करता कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी केंद्र सरकारप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा. गणवेश भत्ता, पदनाम बदल, परिचारिका संवर्गातील पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वेतनवाढ देण्यात याव्यात, परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यासाठी निवासस्थान अपुरे आणि खूप जुने आहेत. त्यांना नवीन निवासस्थान बांधून द्यावेत.