पुणे : चंदन तस्करी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून चंदनाच्या झाडांचे ओंडके, दुचाकी असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून चंदन चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
निलेश बाळू डोळस (वय ३०, रा. निगडी ओटा वसाहत, मिलिंदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डोळस चंदनाचे ओंडके विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात डोळस दुचाकीवरून आला. पोलिसांच्या पथकाने डोळसला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पोत्यात चंदनाचे चार ओंडके आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या चंदनाच्या ओंडक्यांची किंमत ५० हजार रुपये आहे.
डोळस याच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अंतर्गत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अमोल पवार, अजय थोरात, अयाज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, इम्रान शेख आदींनी ही कारवाई केली.