पुणे – सध्या ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना लसीचे दोनही डोस झाल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश नाही. त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लसीकरणाचे दोन डोस घेणे अनिवार्य आहे, असे पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदार यांनी सूचित केले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा शिवाजीनगरच्या मॉडर्न महाविद्यालयात पार पडली. विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, संस्था यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात आयोजित कार्यशाळेत बोंदार बोलत होते. यावेळी प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहसचिव प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य राजेंद्र झुंजारराव, उच्च शिक्षण विभागचे अधिकारी अर्चना बोराडे उपस्थित होते.
गेल्याच आठवड्यात उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना लसीचे दोनही डोस घेणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही डोस न घेतल्यास अशांना नोटीस व काही दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर मात्र वेतनात कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. याच विषयावर बोंदार यांनी कार्यशाळेत लसीकरणाचे दोनही डोस शिक्षक व कर्मचाऱ्यांना बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता शिक्षक व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे दुर्लक्ष करणे महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे.